कोकणची सैर

 कोकणची सैर



             उत्तरेकडील बोर्डीपासून ते दक्षिणेकडील शिरोडा पर्यंत पसरलेला कोकणचा महाराष्ट्रातील समुद्रकिनारा विस्मयकारक नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे.

पश्चिमेकडे अरबी समुद्र आणि पूर्वकडे सह्याद्रीच्या पर्वतरांगा यांच्यामध्ये पसरलेली कोकणची किनारपट्टी खनिजद्रव्याने संपन्न आहे. येथे अत्यंत स्वच्छ-सुंदर सागरीकिनारे आहेत आणि किनाऱ्यावर वसलेली रत्नागिरी–गणपतीपुळेसारखी सुंदर शहरेदेखील आहेत. जर तुम्ही इतिहासप्रेमी असाल आणि छत्रपती शिवरायांच्या नेतृत्वाखालील मराठा साम्राज्याची शक्ती तुम्हाला अनुभवायची असेल, तर मालवणच्या किनाऱ्यावर उभा असणारा सिंधुदुर्ग किल्ला तुम्हाला साद घालतोय. ज्यांना साहसी खेळांची आवड आहे, त्यांच्यासाठी सिंधुदुर्गात स्नॉर्कलिंग- स्कुबा डायव्हिंगसारख्या संधी उपलब्ध आहेत. कोकणाच्या सागरीकिनाऱ्याची सफर करताना रत्नागिरी हे तळ ठोकण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. हापूस आंबे, नारळ, फणस आणि १५ व्या् शतकातील किल्याची पार्श्वभूमी असलेले वाळूचे सागरी किनारे यासाठी हे बंदराचे शहर प्रसिद्ध आहे.


स्कुबा डायव्हिंग/ स्नॉर्कलिंग

सिंधुदुर्गात समुद्राचे स्वच्छ सुंदर पाणी आहे. त्या‍मुळे पाण्याखालची अनेक उत्तम स्थळे पाहता येतात. भारतीय उपखंडातील काही मोजक्या स्कुबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंगच्या ठिकाणांपैकी हे एक आहे.




मिऱ्या बंदर

यालाच भगवती बंदर असेही म्हणतात. हा एक सुंदर सागरीकिनारा आहे.


सागरी किनारे

मांडवी, पांढरेसमुद्र, भाट्ये आणि गणपतीपुळे आदी सागरीकिनाऱ्यांचे रमणीय आणि चित्रवत सौंदर्य, कोणाच्याही कायम लक्षात राहणारे आहे.


मत्स्य संशोधन केंद्र (झाडगाव,रत्नागिरी)

संशोधन केंद्रासोबतच एक मत्स्यालय आणि समुद्रातील विविध प्रजाती दाखविणारे संग्रहालयही येथे आहे.


रत्नदुर्ग किल्ला

अरबी समुद्राने वेढलेला हा किल्ला इ.स. १३५० ते १५०० या काळात बांधण्यात आला. किल्यात भगवती मंदिर आहे.


थिबा राजवाडा

ब्रह्मदेशाच्या अखेरच्या राजास ब्रिटिश शासनाकडून येथे नजरकैदेत ठेवण्यात आले होते.


टिळक स्मारक

हे सुप्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थ‍ळ आहे. सध्या ते स्मारकात रुपांतरीत करण्यात आले असून राज्य पुरातत्व विभागाच्या ताब्याात आहे. टिळकांच्या जीवनातील महत्वाच्या घटनांची छायाचित्रे येथे संवर्धित करण्यात आली आहेत.


पतितपावन मंदिर

क्रांतिकारक नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सर्वधर्मसमावेशक कार्याचे प्रतीक असणारे हे मंदिर आहे. येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक आणि पीर बाबरशेख दर्गा ही ठिकाणेही रत्नागिरीत पाहण्यासारखी आहेत.


गणपतीपुळे

सुमारे ४०० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले श्रीगणेशाचे मंदिर येथे आहे. सागरी किनारी एका प्रचंड शिळेवर ते बांधण्याात आले असून, येथील मूर्ती स्वयंभू असल्याचे मानण्यात येते. गणपतीपुळ्याचा समुद्रकिनाराही सुंदर आणि स्वंच्छ आहे. येथून एक किमी अंतरावर मालगुंड हे एक लहानसे गाव आहे. तेथे मराठी कवी केशवसुतांचे स्मारक, मराठी साहित्य परिषदेने बांधले आहे. हेसुद्धा पाहण्यासारखे ठिकाण आहे.


सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग हा ५,२०७ चौ.किमी क्षेत्रफळावर पसरलेला जिल्हा् आहे. यात मालवण, कणकवली, देवगड, वैभववाडी, कुडाळ, वेंगुर्ला, दोडामार्ग आणि सावंतवाडी या तालुक्यांचा समावेश होतो. सागरीकिनाऱ्यांच्या पर्यटनासाठी हा जिल्हा अतिशय उत्तम आहे. कोकण रेल्वेने हा भाग देशाच्या, विविध भागांशी जोडला गेला आहे. मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवडत्या किल्यावरून या जिल्हयाचे नाव ठेवण्यात आले आहे. सुंदररित्या वसलेले मालवण हे किनारपट्टीचे शहर सिंधुदुर्ग किल्यासाठी प्रसिद़्ध आहे. मालवणी खाद्यसंस्कृती देखील देशभर प्रसिद्ध आहे.


पावस:

पावस हे स्वामी स्वरुपानंदांच्या आश्रमासाठी ओळखले जाते. येथे एक प्राचीन शिवमंदिर, पाच रांगांच्या दीपमाळ आणि बुंध्यात स्वयंभू गणपती असलेले झाडही आहे.


जयगड

कऱ्हाटेश्वर प्राचीन मंदिर हे जयगड किल्यापासून १.५ किमी अंतरावर आहे.


दापोली

हे लहानसे शहर आंब्याच्या बागा आणि आंब्याच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि साने गुरुजी संस्थाही आहे. खेड हे दापोलीपासून सर्वात जवळचे (२७ किमी) कोकण रेल्वेचे स्थानक आहे.


पूर्णगड

पूर्णगड येथून समुद्राचे मनोहारी दर्शन होते. या किल्याकडे जातानाच पावस येथे स्वामी स्वरुपानंदांच्या समाधी आणि आश्रमाला भेट देता येते.


हर्णे

हर्णे आणि मुरुड येथील अप्रतिम सागरीकिनाऱ्यांसाठी येथील रिसॉर्टवर पर्यटकांची गर्दी असते. सिद्धीविनायक मंदिर, दुर्गादेवी मंदिर आणि सुवर्णदुर्ग किल्ला ही येथील काही आकर्षक ठिकाणे आहेत. हर्णेपासून १५ किमी अंतरावर असलेले आंजर्ले हेही बीच रिसॉर्टसाठी प्रसिद्ध आहे.


संगमेश्वर

संगमेश्वर हे अलकनंदा आणि वरुणा या नद्यांचा संगम असणारे श्रद्धाळूंसाठी फारच पवित्र ठिकाण आहे.


चिपळूण

हे निसर्ग सौंदर्याने आणि पश्चिम घाटाच्या उंचच उंच पर्वतरांगांनी वेढलेले ठिकाण आहे. हे देव परशुरामाचे निवासस्थान होते. सध्या हे औद्योगिक शहर बनले असून बहुतांश औषधनिर्मिती आणि रसायननिर्मितीचे उद्योग येथे आहेत. चिपळूणमध्ये गोवळकोट किल्ला असून त्याच्यावर ताज समूहाच्या वतीने चालविण्यात येणारे हॉटेल आहे. चिपळूणच्या सभोवताली कोयना धरण (४३ किमी), मार्लेश्वर (६५ किमी), डेरवण शिवसृष्टी (२० किमी) गुहागर (४५ किमी) आणि गुहागरपासून १८ किमी अंतरावर वेळणेश्वर शिवमंदिर आणि सागरीकिनारचे रिसॉर्ट आहे. हेदवी (गुहागरपासून २० किमी) येथे दशभुजा गणेशाचे मंदिर आणि समुद्रकिनारा आहे.


देवगड

देवगड हे तेथील मंदिरे, किल्ला आणि सागरी किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. कुणकेश्वर, गजबादेवी, विमलेश्वर शिवमंदिर, देवगड समुद्र किनारा, देवगड किल्ला, विजयदुर्ग किल्ला आणि आधुनिक पवनचक्या ही प्रेक्षणीय स्थळे आहेत. देवगड हे हापूस आंब्यांसाठीही ओळखले जाते. दक्षिणेला देवगड आणि कुणकेश्वराच्यामध्ये तारा मुंब्री समुद्रकिनारा आहे. येथील रात्रीची चमकणारी चकाकी आणि डॉल्फिन मासा समुद्रात खेळताना पाहायला अनेक पर्यटक येथे येतात.


कुणकेश्वर

देवगड तालुक्यातील कुणकेश्वर हे कोकणातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. हे ठिकाण येथील सुंदर आणि रुपेरी वाळूच्या किनाऱ्यासाठीही प्रासिद्ध आहे. किनाऱ्यावर ई .स. १६५० मध्ये बांधण्यात आलेले हेमाडपंथी शिवमंदिर आहे.


तारकर्ली

कर्लीं नदी अरबी समुद्राला मिळते तेथे हे ठिकाण आहे. शहरी जीवनापासून दूर असा हा महाराष्ट्रातील अत्यंत सुंदर सागरी किनारा आहे. येथील पाणी इतके सुंदर आहे की, १५ फुटांपर्यंत समुद्रतळ सहज दिसतो. तारकर्ली समुद किनारा आणि तारकर्ली खाडी हा पक्षीनिरीक्षकांसाठी तर स्वर्गच आहे. तसेच कोळंब, आचरा, देवबाग. मालवण येथून सिंधुदुर्ग किल्यावर जाण्यासाठी नौका मिळतात, तोही अप्रतिम आहे. धामापूर तलावही (२० किमी) पाहण्यासारखा आहे.


कुडाळ

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कुडाळ हे रम्य गाव आहे. येथे कृषी संशोधन केंद्र आणि कुडाळेश्वराचे मंदिर आहे.


वेंगुर्ला

सागरीकिनाऱ्यावरील हे लहानसे शहर मुंबईपासून ५२४ किमी अंतरावर आहे. वेंगुर्ला तालुक्यात अत्यंत सुंदर आणि अप्रतिम सागरी किनारे आहेत. येथील विद्युतगृह, फळ संशोधन केंद्र, बाजारपेठ, सागरेश्वर किनारा, वायंगणी किनारा, मोचेमाड ही प्रेक्षणीय स्थेळे आहेत.


आंबोली

घनदाट अरण्य आणि खोल दऱ्यांनी वेढलेले आंबोली हे ठिकाण सह्याद्रीच्या रांगांमध्ये ६९० मीटर उंचावर वसलेले आहे. दमछाक करणाऱ्या पर्वतरांगा, नेत्रदीपक धबधबे आणि डोंगराच्या पायथ्याशी धुक्याची वस्त्र व्यापलेले कोकण, ही विभागाची वैशिष्टये आंबोली येथे पाहायला मिळतात. आंबोली येथून या देखाव्याचे परिपूर्ण दुश्य पाहायला मिळते. महादेवगड, नारायणगड, नांगरतास धबधबा, सुर्यास्त पाहण्याचे ठिकाण आणि आणखी काही निसर्गरम्य देखावे पाहण्याचे स्थळे या ठिकाणी आहेत.


मोती तलाव, सावंतवाडी

सावंतवाडी पहिल्यांदा पाहताना तुम्हाला असे वाटू शकते की, नैनितालचा एखादा तुकडा चुकून पश्चिम घाटात तर नाही ना पडला. हे शहर सावंतवाडीच्या भोसले राजघराण्याचे संस्थान होते आणि आजही संस्थानाची भव्यता दर्शविणाऱ्या काही गोष्टी येथे आहेत. हिरव्यागार टेकड्यानी वेढलेला भव्य असा मोती तलाव राजवाड्याजवळ आहे. राजवाड्याचे प्रवेशद्वार आणि घड्याळी मनोरा यांचे प्रतिबिंब या तलावाच्या पाण्या्त पडते. पर्यटक या तलावात पॅडल बोटीने नौकानयन करू शकतात. तसेच, तलावाशेजारच्या उद्यानातून फिरून येथील हिरवे सौंदर्य अनुभवू शकतात. सुर्यास्तानंतर तलावाभोवती करण्यात आलेली रोषणाई पाहाणे, हेही तुमची सुट्टी अविस्मरणीय करणारे असते.


रायगड किल्ला, रायगड

रायगड किल्ला हा एक डोंगरी किल्ला असून महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगांमध्ये तो आहे. हा किल्ला समुद्र सपाटीपासून २,७०० फूट उंचीवर आहे. या किल्ल्यावर जायला अंदाजे १४००-१४५० पायऱ्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७४ मध्ये हा किल्ला आपली राजधानी केली. या किल्ल्यात गंगासागर तलाव कृत्रिमरित्या तयार करण्यात आला आहे. मुख्य बाजारपेठेच्या अवशेषांच्या सन्मुख छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या मार्गावरून जगदीश्वर मंदीर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीकडे जाता येतं.


मुरुड जंजिरा किल्ला, अलिबाग

या किल्ल्यावर २२ गोलाकार बुरूज आहेत. तो ३०० वर्षे जुना आहे आणि स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. किल्ल्याच्या आतमध्ये २ पाण्याच्या टाक्या आणि काही मजारी आहेत.


माथेरान, नेरळ

माथेरान हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. पश्चिम घाटांच्या रांगेत समुद्र सपाटीपासून २,६२५ फूट उंचीवर ते वसले आहे. माथेरानमध्ये अंदाजे ३८ ठिकाणे आहेत जिथून आसपासचे डोंगर आणि दऱ्यांचे सुंदर दृश्य दिसते. माथेरानमध्ये घनदाट जंगलाचे आच्छादन आहे. इथले काही लोकप्रिय पॉईंट्स म्हणजे वन ट्री हिल पॉईंट, द लुईझा पॉईंट, हार्ट पॉईंट, मंकी पॉईंट, रामबाग पॉईंट, इ.


शिव मंदिर, अंबरनाथ

अंबरनाथचे प्राचिन शिवमंदिर शिलाहार राजा माम्वानी यांच्या राज्यकाळात म्हणजेच १० जुलै १०६० रोजी बांधण्यात आले. या मंदिरात ब्रह्मा, शिव, सूर्य, विष्णू या देवता एकाच मूर्तीत दाखवले आहेत. या मूर्तीतून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे. मंदिरावर केलेले शिल्पकाम पाहुन थक्क व्हायला होते. पायापासुन शिखरापर्यंत हे मंदिर अगदी नखशिखांत सौंदर्याने नटलेले आहे. महाशिवरात्री, श्रावणी सोमवारी येथे भाविकांची गर्दी उसळते.


जव्हार राजवाडा, पालघर

हा राजवाडा पालघर पासुन 42 किमी अंतरावर स्थित आहे.तसेच 'पालघर जिल्हा महाबळेश्वर' म्हणून ओळखले जाते. दुर्मिळ फर्निचर आणि अन्य वस्तूही येथे जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. जव्हार हे वारली पेंटीगसाठीपण प्रसिध्द आहे. राजवाडय़ात मुकणे घराण्यातील राजांची सुंदर तैलचित्रे आहेत. पावसाळ्यात जव्हार हा भेट देण्याचा सर्वोत्तम काळ असतो तेव्हा धुक्यांनी आसपासची गावे आणि टेकड्या झाकून जातात.


अर्नाळा किल्ला, वसई

अर्नाळा सागरी किल्ले मधील उत्तम किल्ला आहे. तो वसई तालुक्यातील, अर्नाळा गावात स्थित आहे. अर्नाळा किल्ला 'जलदुर्ग ' किंवा 'जंजिरे अर्नाळा' असे देखील ओळखले जाते. ठाणे जिल्ह्यातील उत्तर कोकण डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने जास्त सोपा समजला जातो. हा किल्ला आकारात आयताकृती आहे आणि जवळजवळ पाणी वेढला आहे. तीन प्रवेशद्वार आहे त्यापेकी एक प्रवेशद्वार दोन्ही बाजूंच्या मोठी बुरुज आहे जे किल्ल्याच्या उत्तर बाजूला आहे.


कोकणाची खाद्यसंस्कृ्ती

कोकणातील खाद्यसंस्कृती ही तोंडाला पाणी सुटणाऱ्या अनेक पाककृतींसाठी प्रसिद्ध आहे आणि या पाककृती मालवणी खाद्यसंस्कृती म्हणून ओळखल्या जातात. प्रसिद्ध आणि मसालेदार पदार्थ म्हणजे येथील समुद्री खाद्यपदार्थ. उकडीचे मोदक, माशांचा मालवणी रस्सा आणि कोंबडीवडे हे इथले विशेष पदार्थ, तसेच सोलकढी हे कोकणातले प्रसिद्ध पेय आहे.

Post a Comment

0 Comments