आता ” डिझायनर बेबी “देखील !
सध्याच्या काळात, विशेषतः कोरोना (Corona) काळात तर सगळंच काही ऑर्डर करून पार्सल घरी येत होतं. तेव्हा ते गरजेचंही होतं .पण अलीकडे कामाचे भरपूर तास ,त्यामुळे स्वयंपाक घर आणि खाणं बनवणं याला मिळालेले दुय्यम स्थान ही वास्तव परिस्थिती असली, तरी पोट आणि जीभ ही तीच आहे . तिला सगळं काही चविष्ट लागतंच आणि पोटातले कावळे ही ओरडतातच . अर्थात आता सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळ्या गोष्टी ऑर्डर केल्या जातात मग त्यात पराठेच हवे असतील तर सगळ्या प्रकारचे पराठे, उकडीचे मोदक, पुरणपोळी ,कटाची आमटी पासून मोमोज नूडल्स हवं ते हवं तेव्हा ऑर्डर करता येतं .घरातल्या वस्तू, कपडे ,दागिने, किराणा कामवाल्या मावशी शोधणे ,हॉस्पिटल शोधणे सगळे ॲप वर क्लिक केले की मिळते . म्हणूनच कधीतरी आम्ही या नवीन पिढीला उद्देशून गमतीने म्हणायचो देखील. आता पुढे हे लोक, पोरही ऑर्डर करतील आणि घरपोच मिळवतील.
आणि नुकताच एका पेपर मध्ये एक लेख वाचनात आला . गर्भसंस्कारांशी संबंधित होता तो ! पण ते व्हिडिओज वर्कशॉप आणि ॲप्स च्या माध्यमातून ! इथ पर्यंत ठीक आहे हो ! गर्भ संस्कारांचे संदर्भ आपल्या प्राचीन संस्कृती देखील सापडतात. त्याला काही शास्त्रीय आधार देखील आहेत. पण हे सगळं काही मर्यादेपर्यंत ! मात्र जर तुम्हाला हवे तसे बाळ मिळण्यासाठी डिटेल्स पाठवायचे म्हणजे ते दिसावं कसं ? डोळे घारे असावे की निळे ? केस पिंगट हवे की काळे ? बाळ नाजूक हवं की छान वजनाचं आणि आम्ही खात्री देतो की तुम्हाला हवा तसं बाळ घरी येऊन जाईल ! ही तर खरंच मार्केटिंग स्टेटेजीचं वाटते. अशी बाळ मिळवण्याचे वेड भारतीय नवतरुण तरुणींमध्ये वाढत आहे.
मला यातून एक खूप महत्त्वाची गोष्ट वाटते की यानिमित्ताने स्तोत्र, मंत्र,चांगल्या कथा वाचायला ही पिढी या निमित्ताने तयार होत आहे .मेडिटेशन, ध्यान, प्राणायामाकडे तरुण आई-बाबा वळतात आहे कारण हीच गोष्ट आई आजींनी सांगितली असती, तर तिला तडीपार केल्या गेलं असतं . पण ॲप्स लाईफ कोच सांगतात आहे ,ते सगळं बरोबरीचे मित्रमंडळी फॉलो करतात आहे म्हणजे योग्य आहे ही विचार प्रणाली सध्या प्रचलित आहे.या डिझायनर बेबी बद्दल उत्सुकता वाटतच होतीच .बघा हा ! एक जाहिरात आहे. एक छोटीशी गोंडस सहा महिन्याची मुलगी . ती कंबर हलवत मुन्नी बदनाम हुई वर डान्स करते. तर दुसऱ्या चित्रात एक मूल संस्कृत श्लोक धडाधड म्हणते .पुढच्या स्लाइडवर एक माणूस विचारतो . कशा प्रकारची बाळ असावीत असं तुम्हाला वाटतं ? याचे उत्तर देता येत नाही ! तर मग पुढच्या व्हिडिओवर टॅग लाईन येते.Baby by choice not by chance ! आणि Design your Baby असं म्हणून गर्भ संस्कारांच्या जगात स्वागत केलं जातं ! असे अनेक ॲप्स व्हिडिओज वर्कशॉप हे सगळे सगळे मिळून प्रेग्नेंट स्त्रीला तिच्या होणाऱ्या बाळावर हिंदू संस्कार, मूल्य, बुद्धिमत्ता संवर्धन कसं करायचं हे सांगायला सुरुवात करतात.
हिमांशी धवन यांचा संडे टाइम्स ला याविषयी एक सविस्तर लेख होता . त्यात त्यांनी भारतीय तरुणांचा Designer mania विषयीचे बरेच मुद्दे मांडले आहेत ,अनुभवी सांगितले आहेत. त्या म्हणतात असे ॲप्स, वर्कशॉप यांचा दावा असतो की त्यांना अपेक्षित असलेलं दिसणं आणि व्यक्तिमत्व हे सुद्धा गर्भात असल्यापासूनच आम्ही त्यांच्या बाळांचे बनवून देऊ शकतो .थोडक्यात आई तिला हवं तसं तिचं बाळ डिझाईन करू शकते . मग या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी स्तोत्र, स्तोत्र मंत्र पठण, श्लोक ,प्रार्थना कोडी सोडवणे, बाळाशी संवाद ,त्याबरोबरच मेडिटेशन ,योगा या सगळ्याची योजना तर केली जाते ,परंतु यावर कडी करत एका ॲप्स वर म्हणतात की पालकांना आम्ही विनंती करतो की त्यांना त्यांच्या बाळामध्ये ज्या क्वालिटीज हव्या म्हणजे त्यांना कसं बाळ हवं ? असं “स्वप्नातलं बाळ “त्याचा “ड्रीम चार्ट” आम्ही मागवतो !
राष्ट्रसेविका समितीच्या सामवर्धिनी न्यास या शाखेच्या मार्फत गर्भसंस्कार वर्कशॉप हे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी घेतले जातात .यातून निपजलेली बाळही देश प्रेम आणि वीर गुण अंगात असणारी असतात असा त्यांचा अनुभव आहे आणि याला आपल्या परंपरेचा आधार देखील आहे.
परंतु त्याचे व्यावसायिकीकरण करणारे बऱ्याच गोष्टी सांगतात की दोन महिन्याचं बाळ हुंकार देताना ”ओम “असं म्हणत असतो किंवा थोडं मोठं बाळ हे फ्लॅश कार्ड च्या मदतीने विमान ,ट्रक हे देखील पटकन ओळखतो. यावेळी नक्कीच विचार येतो की वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी त्याचा सगळं ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण जर पूर्ण होत असेल तर पुढे त्या बाळाचे काय?
एक लाईफ कोच ,माईंड ट्रेनर आणि गर्भसंस्कार कोच हे ड्रीम बेबी visualization च्या तंत्रावर भर देऊन फक्त नऊ दिवस यासाठी पुरेसे असल्याचे चॅलेंज देतात .अवघ्या नऊ दिवसात फक्त 99 रुपये बाळाची डेव्हलपमेंट करून मिळेल अशी ऑफर देतात. काही ॲप्सची सबस्क्रीप्शन ची कमाल फी पंधरा हजार पर्यंत आहे. यात जो प्रोग्राम बाळासाठी तुम्ही सिलेक्ट कराल त्याप्रमाणे किंमत ठरते.
यातले कार्यक्रम कसे असतील अशी आपल्याला उत्सुकता असतेच ,तर त्यात कुठे संकल्प पूजन आणि हवन यातून सुरुवात होते. त्यामुळे पालकांना पूर्ण प्रोग्राम गंभीरपणे घ्यावाच लागतो.
त्याचप्रमाणे मंत्र ,श्लोक, आहार पद्धती ,समुपदेशन ,म्युझिक थेरपी त्याचप्रमाणे विशिष्ट महिन्यांसाठी विशिष्ट प्रार्थना असतात. जसे की कन्सप्शन साठी बीज शुद्धि मंत्र तर फर्स्ट ट्रायमिस्टर साठी पूनवसन संस्कार ! किंवा बाळाच्या संरक्षणार्थ इष्टमंत्रांचे 108 वेळा पठण. योगा एक्सपर्ट किंवा पर्सनल कौन्सिलिंग घेतले जातात.” गर्भ सखी “या ॲपमार्फत गर्भवती स्त्रियांशी संबंधित प्रश्न म्हणजे चिडचिड किंवा एन्जॉयटी यासाठी ॲप्स 65 हजार आहेत. चाळीस हजारापेक्षा जास्त स्त्रियांनी त्यांचे वर्कशॉप केले आहेत. ड्रीम चाइल्ड साठी दीड लाख लोकांनी नाव नोंदवली आहेत.
अर्थात त्यातील काहीजण म्हणतात की कुठलाही धर्म अध्यात्म हे सोडून फक्त आरोग्यपूर्ण आनंदी आई आणि परिणामतः यांच्यासाठी आमचा प्रोग्राम आहे.
या ॲप्स फायदा मिळवणारे काही पालक अनुकूल प्रतिक्रिया देखील देतात की त्यांच्या बाळाचा SQ आणि IQ हाय आहे आणि मला जसं हवं होतं तसं ते बाळ दिसतं. आणखीन एक आई म्हणाली की तिचं बाळ सात महिन्याचा उभा राहिला आणि राधे राधे आणि राम हे शब्द म्हणू लागलं . त्यांचे सॉफ्टवेअर इंजिनियर असलेले पती देखील म्हणतात की आम्ही आमची जुनी संस्कृती मूल्य विसरलेलो होतो त्यांच्याशी परत जोडले गेलो .
आपल्याकडेही गर्भसंस्कार यांची कल्पना नवीन नाहीच. अगदी अभिमन्यूने आईच्या उदरात युद्ध कौशल्य शिकायला सुरुवात केली. नंतर सुभद्रेला गोष्ट ऐकतानाच झोप लागल्याने त्याला चक्रव्यूह भेदण्याचे ज्ञान तेवढे मिळाले नाही हे आपण ऐकत आलो आहोत किंवा जिजाबाईंनी शिवबा पोटात असताना केलेले वाचन, त्याचप्रमाणे भक्त प्रल्हाद आईच्या गर्भात असताना ऐकलेल्या स्तोत्र मंत्रांमुळे तो विष्णू भक्त झाला हे पारंपारिक पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेतच. त्यामुळे गर्भसंस्कार याबाबतीत दूमत नाही.
मुल आईचा आवाज ओळखते किंवा आपल्याकडे गरोदर स्त्रियांना धर्मग्रंथ पठण करायला सांगतातच .आईच्या मनस्थितीचा बाळावर आणि त्यांच्या तब्येतीवर परिणाम होतो .प्राणायाम दीर्घ श्वसनाचा फायदा दोन कळांच्या मध्ये आराम करण्यासाठी आणि कळा देण्यासाठी देखील होतो. त्याशिवाय गर्भवतींवरचा ताण, तिची चिंता ही यामुळे दूर होते. हे सायन्स द्वारे देखील आता सिद्ध झालेले आहे आणि डॉक्टर लोक देखील याला मान्यता देतात. एव्हढेच काय आतापर्यंत हे सगळं घरोघरी आई आजी सासू सांगतच होत्या. हा जनरेशनचा प्रश्न आहे .आजच्या टेक्नोसेव्हीं आणि गुगलबाबांना मानणाऱ्या सगळ्या माता आहेत .त्या मागची शास्त्रीय माहिती कदाचित जुन्या लोकांकडे नसेल आणि तरुण मुलींच्या ” का ?” या प्रश्नाला उत्तर मिळत नसल्याने त्यांनी सांगितलेले आहे .या सगळ्या गोष्टी त्यांना भंकस वाटू शकतात. अगदी आकर्षणाच्या नियमानुसार हवी तशी बाळ जर सतत नजरेसमोर ठेवली तर मुलं तसे दिसणारे होऊ शकतील म्हणून पूर्वीपासून आपल्याकडे गर्भवतीच्या खोलीमध्ये हसल्या बाळाचा फोटो देखील लावल्या जायचा यामागे हे शास्त्र देखील पूर्वीच्या लोकांना माहिती होतं किंवा असाव असं वाटतं.
पण आता फक्त एवढंच वाटतं की आजच्या पिढीकडे पैसा आहे आणि त्याचा उपयोग विविध व्यावसायिक करतात. तरुण-तरुणींची बदललेली मानसिकता आणि पैसा यावर हे नवे उद्योग उभे राहतात व्यवसाय करतात. त्याला शास्त्रीय पार्श्वभूमी आहे ,पण तरीही ड्रीम चाइल्ड , हे ड्रीम चार्ट देऊन डिझाईन करता येते याला शास्त्रीय पुरावा किंवा संशोधन झालेले वैद्यकीय क्षेत्रात मी अजून तरी ऐकलेले नाही. येथे संशोधनाला जरूर वाव आहे .
पण तरीही संस्कृतीशी नाते जोडणारे ,आपली मूल्ये रुजवणारे असे सगळे प्रयोग हे ॲप्स करतात आणि या निमित्ताने का होईना या सगळ्यांपासून दूर जाणारी आमची तरुण पिढी ,कशी का होईना परत याकडे वळते हाच मला तरी एक दिलासा वाटतो आहे . यावर आणखीन संशोधन मात्र केले जायला हवे. नाहीतर काही अंशी ही पैशाच्या उपलब्धतेतून डोळ्यात धुळफेक करून घेतल्यासारखे होईल असे वाटते.
0 Comments