आज छत्रपती शाहूराजे भोसले यांचा जन्म, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा स्मृतीदिन, भारताची पहिली अणूचाचणी; आज इतिहासात

18th May In History: इतिहासात आजच्या दिवशी भारतासाठीचा दिवस हा सुवर्ण अक्षरांनी नोंदवावा अशी घटना घडली. भारताने संशोधन, आत्मनिर्भरता, शास्त्रज्ञांची कठोर मेहनत, दूरदृष्टीपणा आदीच्या जोरावर पहिली अणुचाचणी केली.

            आजचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक आहे. इतिहासात आजच्या दिवशी भारतासाठीचा दिवस हा सुवर्ण अक्षरांनी नोंदवावा अशी घटना घडली. भारताने संशोधन, आत्मनिर्भरता, शास्त्रज्ञांची कठोर मेहनत, दूरदृष्टीपणा आदीच्या जोरावर पहिली अणुचाचणी केली. या अणुचाचणीमुळे जगाने भारताची दखल घेतली. अण्वस्त्र असलेला सहावा देश म्हणून भारताची नोंद झाली. मराठी वृत्तपत्र व्यवसायाचे जनक, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे निधन आजच्या दिवशी झाले. 

1048: पर्शियन कवी उमर खय्याम यांची जयंती 

उमर खय्याम हे एक प्रसिद्ध ज्योतिषी आणि कवी होते. ईशान्य इराणमधील निशापूर येथे जन्मलेल्या खय्याम यांनी आपले बहुतेक आयुष्य कारखानिद आणि सेल्जुक शासकांच्या दरबारात घालवले.  

1682: मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती, छत्रपती शाहूराजे भोसले यांचा जन्म

थोरले शाहू महाराज यांचा जन्म 18 मे मे 1682 रोजी झाला. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांचे चिरंजीव होते. जन्मापासूनच ते मोंगल बादशहा औरंगजेबाच्या त्याब्यात होते. राजाराम महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर राणी ताराबाई यांनी राज्यकारभार करण्यास सुरुवात केली. तिला शह बसावा म्हणून औरंगजेबाने शाहूंना सोडून दिले. ताराबाईच्या सैन्याशी शाहूच्या सैनिकांनी केलेल्या लढाईनंतर झालेल्या तहान्वये राज्याची वाटणी झाली व थोरल्या शाहूंना साताऱ्याला राज्य स्थापन करण्याची परवानगी मिळाली. साताऱ्याला या थोरल्या शाहूंनी 1707 पासून ते मरेपर्यंत म्हणजे 15 डिसेंबर 1749 पर्यंत राज्य चालविले. साताऱ्याची राज्य गादी ही थोरली गादी म्हणून ओळखली जाते. 

1846: मराठी वृत्तपत्र व्यवसायाचे जनक, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे निधन

आचार्य बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पोंबर्ले येथे  20  जानेवारी 1822 रोजी झाला. त्यांनी बालपणी वडिलांकडे घरीच मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास केला. 1825 मध्ये ते मुंबईत आले. मुंबईत त्यांनी सदाशिव काशीनाथ ऊर्फ ‘बापू छत्रे’ आणि बापूशास्त्री शुक्ल यांच्याकडे  इंग्रजी आणि संस्कृतचे शिक्षण घेतले. या दोन विषयांबरोबरच गणित आणि शास्त्र या विषयांत त्यांनी प्रावीण्य मिळविले. ‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या विद्यालयात अभ्यास करून त्यांनी विशीच्या आत कोणाही भारतीयाला तोवर न मिळालेली प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळवण्याइतपत ज्ञान कमवले. 

मुंबई इलाख्यातील प्राथमिक शाळा तपासणीसाठी निरीक्षक म्हणून सरकारने त्यांची नियुक्ती केली होती. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना आद्य मराठी वृत्तपत्राचे जनक, आद्य इतिहास संशोधक, सुधारवाद्यांचे प्रवर्तक, शिक्षकतज्ञ, जेष्ट पत्रकार, एक प्रगमनशील व्यवहारवादी सुधारक म्हणून ओळखले जाते. 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण वृत्तपत्राच्या पहिला अंक प्रकाशित झाला, यामुळे हा दिवस दर वर्षी

 महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. 18  मे 1846 रोजी बनेश्वर येथे त्यांचा मृत्यू झाला. 

1913: गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक पुरुषोत्तम काकोडकर यांचा जन्म

पुरुषोत्तम केशव काकोडकर यांचा  जन्म 18 मे 1913 रोजी झाला. काकोडकर हे भारतीय राजकारणी आणि समाजसेवक होते. ते लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य देखील होते. गोवा मुक्ती संग्रामात त्यांनी सहभाग घेतला होता. 

1933: भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा जन्मदिन

सामाजिक आर्थिक विकास व भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे कट्टर समर्थक असलेल्या श्री. एच. डी. देवेगौडा यांचा जन्म 18 मे 1933 रोजी कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील होलेनारासिपुरा तालुक्यात असलेल्या हरदनहल्ली गावात झाला. सिविल इंजिनीरिंग पदवी धारक  देवेगौडा यांनी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी शिक्षण पूर्ण करून राजकारणात प्रवेश केला. 1953 साली त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला व 1962 पर्यंत ते या पक्षाचे सदस्य राहिले. एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबाचे सदस्य असलेल्या देवेगौडा यांनी शेतकऱ्याच्या जीवनातील समस्या जवळून पाहिल्या होत्या. त्यामुळे त्यांनी शेतकरी, वंचित शोषित लोकांच्या हक्कासाठी आवाज उठवला. 11 डिसेंबर 1994 रोजी ते कर्नाटकाचे 14 वे मुख्यमंत्री बनले. 30 मे 1996 रोजी देवेगौडा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

1974: भारताने पहिली अणुचाचणी केली 

भारताने राजस्थानमधील पोखरणच्या वाळवंटात पहिली अणुचाचणी केली. स्माइलिंग बुद्धा असे या पहिल्या अणुचाचणीचे नाव होते. भारताने केलेल्या अणुचाचणीमुळे अमेरिका, सोव्हिएत रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीननंतर भारत हा जगातील सहावी अणुशक्ती असलेला देश झाला. 

भारताच्या पहिल्या अणुचाचणीची माहिती त्या काळी प्रचंड गोपनीय ठेवण्यात आली होती. त्यापूर्वी लोकांना घटनेविषयी काहीच कल्पना नव्हती. लष्कराचे हेलिकॉप्टर, वाहन गावात यायचे. अधिकारी, वैज्ञानिक हे डॉक्टर बनून लोकांमध्ये मिसळून जायचे. परंतु ते नेमके कशासाठी आले याचा कोणालाच थांगपत्ता नव्हता. चाचणीसाठीच्या अणुबॉम्बला १९७ मीटर खोल रेतीत गाडून ठेवण्यात आले होते. यासाठी ७५ वैज्ञानिकांचा चमू कार्यरत होता. परंतु याविषयी कोणतीच माहिती बाहेर जात नव्हती. 

1940 च्या दशकात डॉ. होमी भाभांनी पाहिलेले “शांततेसाठी अणुकार्यक्रम’ हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यातील एक महत्त्वाचा टप्पा या स्फोटाद्वारे पार पडला होता. 

2017: अभिनेत्री रिमा लागू यांचे निधन 

अभिनेत्री रिमा लागू  यांचा जन्म  मुंबईतील गिरगांव येथे 21 जून  १९५८ रोजी झाला. त्यांनी अनेक मराठी आणि  हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. सुमारे चार दशकांचा मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अनुभव असलेल्या रीमा लागू यांनी अनेक हिंदी चित्रपटांमधून चरित्र अभिनेत्री म्हणून काम केले. मैने प्यार किया, हम आपके हैं कौन, हम साथ साथ हैं यासारख्या हिंदी चित्रपटांमधील तसेच तू तू मै मै या हिंदी दूरदर्शन मालिकेमधील त्यांचे काम चांगलेच गाजले. 18 मे 2017 रोजी त्यांचे निधन झाले. 

इतर महत्त्वाच्या घडामोडी: 

1804: नेपोलियन बोनापार्ट फ्रान्सचा सम्राट झाला. 

1912: पूर्णपणे भारतात बनवलेला पुंडलिक हा मूकपट प्रदर्शित झाला. 

1938: प्रभातचा गोपालकृष्ण हा चित्रपट मुंबईच्या सेंट्रल सिनेमात प्रदर्शित झाला.

1940: प्रभातचा संत ज्ञानेश्वर हा चित्रपट मुंबई व पुणे या ठिकाणी एकाच दिवशी प्रदर्शित झाला.

1972: दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली.

1991: रशियाच्या सोयुझ अंतराळातुन भ्रमण करणारी हेलन शेरमन ही महिला पहिली ब्रिटिश अंतराळयात्री बनली.

1999: पहिले राष्ट्रीय बुद्धीबळ विजेते रामचंद्र सप्रे यांची पुण्यतिथी 

Post a Comment

0 Comments