गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नियमीत रेल्वे गाड्यांचे बुकींग दुसऱ्याच दिवशी फुल्ल!

 

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नियमीत रेल्वे गाड्यांचे बुकींग दुसऱ्याच दिवशी फुल्ल!



मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची मेल-एक्स्प्रेससाठी तिकीट आरक्षणाची लगबग सुरू झाली आहे. यंदा गणरायाचे आगमन १९ सप्टेंबर रोजी होणार असून १६ मे २०२३ पासून रेल्वे प्रशासनाकडून गणेशोत्सवासाठी आरक्षण सुरु झाले आहे. परंतु, दुसऱ्या दिवशी कोकणात नियमित धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे.या गाड्यांची प्रतीक्षा यादी दोनशेच्याही पुढे गेली आहे. तर काही गाड्यांच्या ठराविक श्रेणीतील बोटावर मोजण्याइतपत आसने शिल्लक आहेत. गणेशोत्सवाला ४ महिने उरले असतानाच कोकणात जाणाऱ्यांनी रेल्वे गाड्यांचे आरक्षण करण्याची सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोकण मार्गावर सर्वाधिक लोकप्रिय असलेली कोकणकन्या एक्सप्रेस दुसऱ्याचा दिवशी हाऊसफुल झाली आहेत.

दादर, वसई, ठाणे आणि पनवेल आदी स्थानकातून गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या रेल्वेच्या लांबपल्याच्या गाड्या प्रत्येक वर्षी भरभरून जात असते. तसेच खासगी वाहने, एसटी, खासगी बसेसप्रमाणेच मेल एक्स्प्रेस गाड्याच्या तिकिटांची प्रचंड मागणी असते. त्यातच रेल्वे प्रवासास सर्वाधिक पसंती दिली जाते. यंदा देखील १२० दिवस आधी म्हणजेच ४ महिने आधीपासूनच रेल्वेच आरक्षणाला सुरुवात झाली आहे.

यामध्ये मंगळवार १६ मे रोजी १३ सप्टेंबर रोजीच्या गाडीचे आरक्षण करता येईल तर बुधवार १७ मे रोजी १४ सप्टेंबर रोजीच्या गाडीचे आरक्षण करता येईल असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र अवघ्या २४ तासांच्या आतच मुंबईहून कोकणाकडे जाणाऱ्या गाड्यांमधील जवळपास सर्व श्रेणीतील आसने फुल झाली आहेत. यामुळे चाकरमान्यांचे रेल्वेच्या विशेष गाड्यांकडे लक्ष लागले आहे.

प्रतीक्षा यादी

गाड्या - स्लीपर श्रेणी - ३ टायर एसी

कोकणकन्या एक्सप्रेस -२८९-१७२

तुतारी एक्सप्रेस -८३- २८

मंगुळुरु एक्सप्रेस - ६९ -२२

(टीप : वरील गाड्या आणि आसन स्थिती १७ मे रोजी सायंकाळ ६ पर्यंतची आहे)

Post a Comment

0 Comments