खेड, ता. ७ : तालुक्यातील अनेक भागांमध्ये डोंगर उतारावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. गतवर्षी पावसाळ्यात तालुक्यातील सातगाव व पंधरागाव परिसरात डोंगर उतारावर मोठ्या प्रमाणात माती ढासळून जीवितहानी झाली आहे. तरीदेखील लाकूडमाफिया डोंगर उतारावरील झाडांवर कुऱ्हाड चालवत असून, त्याचे हात रोखण्याचे काम वनविभाग करताना दिसत नाही. परिणामी, पावसाळ्यात डोंगर उतारावरील झाडांवर चाललेली कुऱ्हाड पुन्हा एकदा माणसाच्या मुळावर उठण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कोकणात गतवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्याने अनेक ठिकाणी डोंगर ढासळणे, हे आता नित्याचेच झाले आहे. महाड, खेड, चिपळूण आदी ठिकाणी डोंगरावरून ढासळलेल्या दगड व मातीखाली मानवी वस्ती गाडली जाऊन अनेकांना प्राण गमवावे लागले. गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात या घटना वाढल्या असून, त्याचे मुख्य कारण राज्य सरकारचे वन व सामाजिक वनीकरण विभागाकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष म्हणावे लागेल. डोंगर उतरावर माती धरून ठेवणाऱ्या झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात पैसे कमवण्यासाठी होत आहे. खेड तालुक्यातील पंधरागाव, सातगाव, शिवतर आदी परिसरातील हजारो एकर भागातील डोंगर उतारावरील झाडे लाकूडमाफियांनी तोडून आपल्या तिजोऱ्या भरल्या आहेत; मात्र या बेलगाम लाकूड व्यापाऱ्यांना नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी असलेले वनविभाग व तालुका प्रशासन मात्र या प्रकारांकडे कानाडोळा करत आहे. परिणामी, आगामी पावसाळ्यात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन जीवितहानी होण्याची भीती व्यक्त होत आहे.
भूस्खलनाचा धोका
खेड तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गापासून जवळच असलेल्या डोंगररांगामध्ये देखील बेसुमार वृक्षतोड झाली असून, या भागात भूस्खलन झाल्यास मातीचा मलबा थेट राष्ट्रीय महामार्गावर येऊन महामार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची भीती आहे. महामार्गाच्या चौपदरीकरण कामासाठी भोस्ते व परशुराम घाटातदेखील डोंगर उतारावरील वृक्षांची पाळेमुळे खोदून काढण्यात आली आहेत. त्यामुळे आगामी पावसाळ्याच्या कालावधीत या भागात देखील दरड कोसळण्याची भीती आहे. या संदर्भात स्थानिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
कोट
महामार्गालगत असलेल्या डोंगरावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. यामुळे भविष्यात पावसाळ्यामध्ये भूसंकलन होऊन मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडू शकतात. गतवर्षी आपल्या खेड तालुक्यातील पोसरे, बिजगर या ठिकाणी अशाच पद्धतीने भूस्खलन झाले. त्यामुळे ही वृक्षतोड नक्की कोणी केली. त्या संदर्भात वनविभागाला चौकशी करून त्या संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश देणार आहे.
0 Comments