महाकाय संसदेचं उद्घाटनला मोदी सरकारच्या नवव्या वर्षपूर्तीचा मुहूर्त!

 

Central Vista new Parliament building likely to be inaugurated on ninth year of the Modi government may end Central Vista : नवी संसद लवकरच सेवेत, महाकाय संसदेचं उद्घाटनला  मोदी सरकारच्या नवव्या वर्षपूर्तीचा मुहूर्त!

नवी दिल्ली : संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन या महिना अखेरीस होण्याची शक्यता आहे.  राजधानी दिल्लीत सध्या बांधकामाची लगबग वाढली असून दुसरीकडे मोदी सरकारच्या नवव्या वर्षपूर्तीची वेळही जवळ येत चालली आहे. त्यामुळे त्याच मुहूर्तावर संसदेच्या नव्या इमारतीचं लोकार्पण होणार का याची चर्चा सुरु झालीय. 

 10 डिसेंबर 2020 मध्ये पंतप्रधान मोदींनी संसदेच्या इमारतीचं भूमीपूजन केलं होतं. सुरुवातीला 2022 च्या हिवाळी अधिवेशनापर्यंत इमारत पूर्ण होईल असं सांगितलं जात होतं. पण कोरोनामुळे डेडलाईन थोडी पुढे गेली. आता ही इमारत जवळपास पूर्ण असून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी ती वापरायला तयार असेल असंही म्हटलं जातंय. 2014 ला सत्तेत आल्यानंतर 26 मे रोजी मोदींचा शपथविधी झाला होता. तर 2019 मध्ये 30 मे रोजी शपथविधी झाला होता. 26 ते 30 मे या काळात मोदी सरकारच्या नवव्या वर्षपूर्तीनिमित्त भरगच्च कार्यक्रम आखले गेलेत. त्याच मालिकेत संसदेच्या इमारतीचं उद्घाटनही असण्याची शक्यता आहे.  तारीख अद्याप निश्चित नाही, पण ही चर्चा मात्र सध्या जोरदार रंगली आहे.

 कशी असणार आहे संसदेची नवी इमारत?

  • संसदेच्या या नव्या इमारतीला 4 मजले, 6 प्रवेशद्वार असतील
  • लोकसभेचे 1 हजार, तर राज्यसभेचे साधारण 400 खासदार बसू शकतील अशी बैठक व्यवस्था
  • सध्या खासदारांना प्रत्येकाच्या आसनासमोर टेबल नाहीत, नव्या संसदेत प्रत्येकासमोर छोटे बाक
  • या बाकांमध्ये हजेरी नोंदवण्यासाठी, मतदान करण्यासाठी, भाषातंर ऐकण्यासाठी अत्याधुनिक व्यवस्था असेल
  • याशिवाय 120 कार्यालयं, म्युझियम, गॅलरीही या इमारतीत असणार आहे

काही दिवसांपूर्वीच स्वत: पंतप्रधानांनी या कामाचा आढावा घेतला होता. त्याचवेळी नव्या संसदेचा पहिला लूक समोर आला होता. सध्या या इमारतीच्या बांधकामाचा वेग वाढला आहे. आजूबाजूचे ढिगारे स्वच्छ करण्याचं काम चालू आहे. त्यामुळे उद्घाटनासाठी कुठली तारीख निश्चित होते याची उत्सुकता आहे. हे कंत्राट टाटा प्रोजेक्ट्सला 2020 मध्ये 861.9 कोटी रुपयांना देण्यात आले होते. त्याची किंमत नंतर वाढवून सुमारे 1,200 कोटी रुपये करण्यात आली. नवीन संसद भवनातील लोकसभेच्या तळाचा आराखडा राष्ट्रीय पक्षी मोर या थीमवर ठेवण्यात आला आहे. नवीन इमारत जुन्या संसद भवनापेक्षा 17,000 चौरस मीटर मोठी आहे.  ही इमारत पूर्णपणे भूकंप प्रतिरोधक आहे, तिचे डिझाइन 'HCP डिझाइन, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड' ने तयार केले आहे. त्याचे शिल्पकार विमल पटेल आहेत.

13 एकरावर नवीन इमारत बांधली जात आहे. हे राष्ट्रपती भवनापासून हाकेच्या अंतरावर आहे. सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या चार मजली नवीन संसद भवनात लाउंज, लायब्ररी, कमिटी हॉल, कॅन्टीन आणि पार्किंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी वर्ष सध्या सुरु आहे. याच वर्षात संसदेच्या नव्या इमारतीत काम सुरु व्हावं ही मोदी सरकारची अपेक्षा आहे. ही उद्घाटनाची तारीख नेमकी काय असणार याची उत्सुकता आहे. 

Post a Comment

0 Comments