महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल दिल्यानंतर त्यावर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बराच गोंधळात टाकणारा असल्याचं मत व्यक्त केलं. ते शुक्रवारी (१२ मे) ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बराच गोंधळात टाकणारा आहे. माझ्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याप्रकरणी मला न्यायालय किंवा पोलिसांकडून नोटीस येतात. त्यातील त्यांची भाषा वाचल्यावर आपल्याला सोडलंय की अटक केली हेच कळत नाही. इतकी ती भाषा गुंतागुंतीची असते.”
“चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला देण्याच्या निर्णयाचं काय होणार?”
“त्यांनी सांगितलं सगळी प्रक्रिया चुकली, मात्र मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नको होता. विधिमंडळातील गट पक्ष समजला जाणार नाही, बाहेरचाच पक्ष म्हणून समजला जाईल. ही गोष्ट झाल्यावर निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचं काय होणार?” असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला.
“सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता निवडणूक आयोग काय करणार?”
“या सगळ्यात निवडणूक आयोग एक यंत्रणा आहे, सर्वोच्च न्यायालय ही एक यंत्रणा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता निवडणूक आयोग काय करणार? म्हणून मी हा निकाल प्रचंड गोंधळात टाकणारा आहे, असं म्हटलं. त्यामुळे ही सगळी धूळ खाली बसल्यावर आपल्या सर्वांना नक्की काय झालंय हे कळेल,” असंही राज ठाकरेंनी नमूद केलं.
0 Comments