कणकवली तालुका तापला

 कणकवली,ता. १७ ः अवकाळी पाऊस, चक्रीवादळाचा तडाका यामुळे वातावरणामध्ये कमालीचा बदल झाला आहे. कणकवली तालुक्यामध्ये उन्हाचा पारा कमालीचा तापला असून तापमानाने ४८° अंशाचा टप्पा गाठल्याने उन्हाच्या झळा आणखी तीव्र झाल्या आहेत. सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम, विवाह सोहळे आणि सुटीमध्ये मौजमजा करण्यासाठी आलेल्या चाकरमान्यांना या उन्हाचा चांगलाच त्रास सहन करावा लागला आहे.



कोकण किनारपट्टीवर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला सातत्याने नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागते. अलीकडे कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अवकाळी पावसाने हजेरी लावली. अधून-मधून चक्रीवादळाचाही थोडाफार प्रभाव जिल्ह्यावर जाणवत आहे. गेल्या महिन्याभरात अधून-मधून पावसाचा शिडकाव सुरू आहे. काही भागात तुरळक तर काही भागात मुसळधार पाऊस कोसळला; मात्र सूर्यही तितकाच तळपत आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात उन्हाचा पारा तापू लागला आहे. कणकवली तालुक्यातील महसुली मंडळा अंतर्गत पर्जन्यमान आणि तापमान मोजणी यंत्रणा आहे. यामध्ये सर्वाधिक नोंद हरकुळ बुद्रुक महसुल मंडळ क्षेत्रात झाली आहे. गेल्या शनिवारी १३ मे रोजी हरकुळ बुद्रुक मंडळ क्षेत्रात ४१.८ अंश सेल्सिअस तापमान होते. शुक्रवारी १२ मेस ४१.७ तर गुरूवारी ११ मेस ४०.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वागदे मंडळामध्ये अनुक्रमे ३९.१, ४०.२ आणि ३८.८ अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद आहे. फोंडाघाट मंडळ क्षेत्रात अनुक्रमे ४०.८, ३९.९ आणि ३८.९ अंशाची नोंद आहे. तळेरे कार्यक्षेत्रात ४१.०, ४०.८ आणि ७३.४३ अंश इतकी नोंद झाली आहे. नांदगाव मंडळ क्षेत्रात ४०.८, ४१.० आणि ३९.६ अंश नोंद आहे. सांगवे मंडळामध्ये ४०.२, ४०.५ आणि ३९.५ अंश सेल्सिअस इतकी उष्णतेची नोंद झाली आहे.
घराबाहेर पडणे असह्य झाले आहे. शाळा महाविद्यालयांना सुटी पडल्यामुळे मुंबईसह इतर भागातून चाकरमानी, व्यावसायिक गावाकडे आले आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना पर्यटनासाठी फिरणे किंवा घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत आणि सायंकाळी सहानंतर थोडाफार दिलासा मिळत आहे. त्यामुळे बाजारपेठावरील खरेदी विक्रीवर परिणाम झाला आहे. ग्राहक सायंकाळी उशीरा बाजारात दाखल होत आहेत. दिवसभर बाजार सामसूम आहे. दुपारच्या वेळेला रस्तेही निर्मनुष्य होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
---
साठवलेल्या आंब्यांचे नुकसान
एकूणच गेल्या आठवड्याभरामध्ये तापमानाचा पारा वाढला आहे; मात्र, आज सकाळपासून तालुका आणि शहर परिसरामध्ये ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तापमानात वाढ होत आहे. त्यातच विजेचाही लपंडाव सुरू आहे. सोमवारी महावितरणचे दुरुस्तीकाम असल्याने दिवसभर वीज गायब होती. या उष्णतेचा परिणाम आंबा, काजू फळावरही होत आहे. तापमान वाढल्यामुळे साठवलेल्या आंब्याचे नुकसान होत आहे.

Post a Comment

0 Comments