आरएचपी फाउंडेशनचा वरुण गोसावी यांना मदतीचा हात

 वरुण गोसावी यांना मिळाली व्हिलचेअर

आरएचपी फाउंडेशनची मदत ; झाडावरून पडल्याने अपंगत्व

रत्नागिरी, ता. १७ : मुंबईत नोकरीला करणारा युवक गावी कामाला म्हणून आला आणि झाडावरून पडून जायबंदी झाला. मणक्याचे दुखणे सुरू झाले, शस्त्रक्रिया झाल्या. परंतु कमरेपासून खाली सर्व संवेदना बंद झाल्याने अपंगत्व आले. त्यामुळे कायम बिछान्यावरच झोपून राहावे लागते. भांबेड (ता. लांजा) येथील वरुण विश्वनाथ गोसावी या तरुणाची ही करुणकथा समजल्यानंतर रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाऊंडेशनने त्याला मदतीचा हात दिला. त्याला नुकतीच व्हिलचेअर देण्यात आली. यामुळे आता त्याचे जगणे थोडे तरी सुसह्य होणार असून त्याच्या कुटुंबीयांच्या चेहेऱ्यावर आनंद पाहायला मिळाला.
वरुण हा विवाहित तरुण मुंबईला चांगल्या कंपनीत वायरमन म्हणून नोकरीला होता. आठ महिन्यांपूर्वी तो गावी कामानिमित्त आला होता. त्यावेळी झाडावरुन पडून अपघात झाला. काम करताना चक्कर येऊन पडल्याने पाठीच्या मणक्याला मार लागला. तीन मणके फ्रॅक्चर झाले. कोल्हापुरातील एका हॉस्पिटलमध्ये मणक्याची शस्त्रक्रिया झाली. पण कमरेपासून खाली सर्व संवेदना बंद झाल्या. आठ महिन्यांपासून घरीच बेडवर झोपून आहे, बसता येत नाही. पाठीचा तोल जातो. घरच्यांच्या मदतीने उठून बसावे लागते.
वरुण गोसावी यांचे लग्न झाले असून पत्नी व मुलगी आहे. वरुण गोसावी यांच्या शस्त्रक्रिया, औषधोपचारांसाठी लाखो रुपये खर्च झाले आहेत. आता चरितार्थ कसा चालवावा, असा प्रश्न समोर आहे. त्यांच्या या आजाराची माहिती रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनचे (आरएचपी) अध्यक्ष सादीक नाकाडे यांना कळताच त्यांनी वरुणची भेट घेतली. त्याची आस्थेने विचारपूस केली, माहिती घेतली. त्याचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे आणि त्याच्या घरच्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी आरएचपी फाउंडेशनतर्फे व्हीलचेअर दिली.
व्हीलचेअर वरुणच्या सोयीची असल्याने त्याचा आत्मविश्वास वाढला. सादीक नाकाडे यांनी त्यांना युरीन मोशनचे प्रशिक्षणही दिले. व्हीलचेअर देताना आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादीक नाकाडे, सदस्य समीर नाकाडे, वरुण गोसावी, आई वैष्णवी गोसावी, वडील विश्वनाथ गोसावी, भावोजी प्रमोद गुरव आणि भाऊ स्वप्नील गोसावी, पत्नी, मुलगी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments