व्यक्तिमत्व विकास आणि शिक्षणाची भूमिका

 

व्यक्तिमत्व विकास आणि शिक्षणाची भूमिका


Personality development Latest News 26-03-2023

        आपले व्यक्तिमत्व प्रभावी असावं ,परिणामकारक असावं ,चार चौघात आपण उठून दिसावं, असं प्रत्येकालाच वाटत असतं .कॉलेजवयीन मुलांमध्ये सुरुवातीच्या दिवसांमध्ये तर तेच एक ध्येय असावं असे युवक युवती वागत असतात . त्यात त्यांचं वय हा महत्त्वाचा घटक असतोच. पण तरीही शिक्षण या घटकाचा व्यक्तिमत्व विकासाला खरंच हातभार लागतो किंवा त्याची भूमिका काय असावी असा विचार करताना लक्षात येतं की घरानंतर शाळा आणि कॉलेजेस हेच तो व्यक्ती स्वतःबद्दल काय विचार करतो किंवा त्याच्या वागण्याच्या पद्धती ,सवयी काय आहेत हे निश्चित करणारी मुख्य केंद्र आहेत .सोलोमन यांनी याच मुद्द्यावर भर देत,” घरानंतर व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम करणारा दुसरा प्रभावी मार्ग म्हणजेच शाळेच्या वर्ग खोल्या आहेत” असे म्हटले आहे. पालकांव्यतिरिक्त इतर कुठल्याही लोकांपेक्षा मुलांच्या पर्सनॅलिटीवर किंवा त्यांच्या विकासावर शिक्षकांचा अतिशय जास्त प्रभाव पडलेला दिसून येतो. मोठ्या लोकांची चरित्र वाचताना आपल्याला हा अनुभव वेळोवेळी येतो. प्राथमिक शाळेच्या स्तरावर तर हे गुरु शिष्य नातं बालकाच्या जीवनावर अतिशय जास्त परिणाम करतं. जेव्हा मूल घरापासून दूर असतं त्यावेळी हे शिक्षक जणू सरोगेट पालक म्हणून आपली भूमिका बजावत असतात. परंतु जसं मूल मोठं होतं ,त्याप्रमाणे हा प्रभाव कमी होताना दिसतो आणि तेच पालकांच्या प्रभावाबाबतही घडतं. पण सुदैवाने तोपर्यंत व्यक्तिमत्त्वाची घडण पूर्ण झालेली असते.अशा या विकासाच्या पायाभरणीच्या काळामध्ये एक असणार त्याच जग आणि दुसर जग म्हणजे शाळा या दोन जगांमध्ये ,मूल्यांबाबत एक वाक्यता असेल, अपेक्षा एकसारख्या असतील आणि मुलांच्या विकासामध्ये मार्गदर्शनही एकसारखं असेल तर या दोघांचाही परस्परांना ,संस्कारांच्या बाबतीत पूरक म्हणून उपयोग होतो . पण जर का मूल्य अपेक्षा आणि मार्गदर्शन हे जर पूर्णपणे भिन्न असेल तर मुलं गोंधळतात. त्यांना नेमकं काय करावं ते कळत नाही. शिक्षक शाळेमध्ये अभ्यासाला खूप महत्त्व देत आहेत आणि पालक मात्र त्याबाबत उदासीन आहेत तर मुलं गोंधळलेली असतात.

मुलांच्या आयुष्यात शाळेची भूमिका इतकी महत्त्वपूर्ण असण्याचं कारण काय ?

तर सगळ्याच मुलांना शाळेला त्यांच्या आवडीनिवडी शिवाय जावं लागतच . दुसरी गोष्ट जेव्हा मुलं शाळेत जातात , शाळेचा प्रभाव जेव्हा पडत असतो तेच वय नेमकं त्यांची स्व जाणीव जागृत होण्याचं असतं. विविध राज्य आणि काही देश यांच्या मध्ये कदाचित शाळेला सुरुवात होण्याचं वय थोडाफार कमी जास्त असेल, पण सर्वसाधारणपणे चार ते पाच वर्षाचा मूल शाळेत जातं.

तिसरी गोष्ट की घराव्यतिरिक्त जिथे मूल जास्तीत जास्त वेळ असतं ती जागा म्हणजे शाळा.

पौगंडावस्थेत तर घरापेक्षाही मुलांचा जास्तीत जास्त वेळ शाळेत जातो. महत्वाची गोष्ट म्हणजे आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या खऱ्याखुऱ्या संधी पहिल्यांदा त्यांना शाळा पुरवते. जणू काही त्यांना स्वतःचा अभिमान वाटावा असे यश मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध संधी पुरवून शाळा महत्त्वाची भूमिका बजावते . एवढेच काय तर शाळा स्वतःचे कौतुक करण्याची, आणि आपल्या क्षमतेच्या प्रत्यक्ष जाणिवेची पहिली संधी उपलब्ध करून देते. आणि हे यश पूर्णपणे पालकांच्या मदतीशिवाय किंवा कुठल्याही पूर्वग्रहांशिवाय मिळालेलं असतं. शाळा हे असं जग आहे की जिथे त्या विद्यार्थ्यांला त्याच्या स्वतःच्या गुणांमुळे ओळखलं जातं, त्याची योग्य अयोग्यता ठरवली जाते. त्याच्या बरोबरीच्या मित्रमंडळी ंमध्ये स्वतःच स्थान कुठे आहे ? लहान मुलांची “सेल्फ कन्सेप्ट” ही इतकी महत्त्वाची आहे की जणू काही त्याची आरशातली प्रतिमा. आणि ती त्याचे पालक आणि त्याचे शिक्षक आणि क्लासमेट्स त्याच्याबद्दल काय विचार करतात यावर करत असते. पण यासाठी मुलांचा शिक्षणाप्रती असणारा दृष्टिकोन देखील महत्त्वाचा ठरतो.

जर त्यांना शिक्षण शाळा कॉलेज आवडत असेल तर ते आपल्या कॅपॅसिटीचा पूर्ण उपयोग करतात आणि शाळा कॉलेजचे अनुभव एन्जॉय करतात. तिथे त्यांना जिवाभावाचे मित्र मिळतात आणि शिक्षक मित्र यांच्याबरोबर अतिशय छान नातं तयार होतं. पण जर का हाच दृष्टिकोन न आवडणारा असेल तर विद्यार्थिनी नेहमी त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी व्यक्त होतात. सततच तक्रारी आणि टीका करतात आणि इतकी भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण होते की कधी कधी ते शाळेत जायला सुद्धा नकार देतात . याचा परिणाम म्हणून बरेचदा शाळा सोडणे किंवा तिथेच थांबून अतिशय चुकीचं वर्तन करणे अशा प्रकारे ते सुडाच्या भावनेने काम करतात.

संशोधन असं सांगते की काही परिस्थिती या अशी शाळेबद्दलची नावड निर्माण करण्याला प्रवृत्त करतात . मुळातच शाळेत जाण्यासाठी मुल शारीरिक आणि मानसिक रित्या तयार असायला हवं. कारण त्यांची हीच तयारी त्यांना शाळेतल्या वातावरणाशी ऍडजेस्ट व्हायला मदत करते. त्याचबरोबर हीच ऍडजेस्टमेंट त्याला इतर लोक आणि त्याचे मित्र मंडळ तसंच तो स्वतःला कशाप्रकारे स्वीकारतो यावरही अवलंबून असते.

या शाळाविषयी दृष्टिकोनावर परिणाम करणारे काही महत्त्वाचे घटक आहेत. शाळेची आवड किंवा नावड हा फक्त अभ्यासाची आवड असणं किंवा नसणं यावरच अवलंबून नाही . तर एखाद्या शिक्षक किंवा एखादा विषय आवडत नाही किंवा शाळेचे कुठले रूल्स हे त्रासदायक वाटतात असं असेल तरी देखील मुलांना शाळा आवडत नाही.

याव्यतिरिक्त इतर काही घटक म्हणजे मुले आणि मुली यांच्याबाबत शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन. सर्वसाधारणपणे मुलींना, त्यांच्या वयाच्या मुलांपेक्षा शाळा आवडते आणि त्यामुळेच त्या जास्त चांगलं काम करू शकतात . क्षमतेचा पूर्ण उपयोग करू शकतात आणि आपोआपच शिक्षकांना पण कमी त्रास देतात .कमी बंडखोरपणा करतात आणि शाळेच्या नियमांचे पालनही करतात.

सामाजिक वर्गवारी म्हणजे शाळेकडे किंवा शिक्षणाकडे बघण्याचा पालकांचा दृष्टिकोन हा बदलणारा असतो. मध्यम वर्गाचे पालक ,शाळा ,मूल्य ,अकॅडमिक अचीवमेंट यांना अतिशय जास्त महत्त्व देतात . ते मुलांच्या वर्गातल्या वर्तनाबद्दल सुद्धा अतिशय जागरूक असतात. कमी उत्पन्न गटातील पालकांना मात्र शाळा ही बरेचदा “वेस्ट ऑफ टाईम “वाटते.

समवयस्कांचा गट याचाही शाळे प्रति असलेल्या आवडीवर परिणाम करीत असतो . कारण समवयस्कांमध्ये जर त्यांना प्रतिष्ठेचे स्थान मिळालं असेल तर ते आनंदाने शाळेसाठी उत्सुक असतात. पीअर प्रेशर चा शिक्षणाप्रती असलेल्या दृष्टिकोनावर फार मोठा परिणाम होतो.

याबरोबरच कमी गुणवत्ता ही मुलांच्या आळशीपणा ,प्रेरणेचा अभाव आणि कुठल्याही ऍक्टिव्हिटी प्रती असलेली उदासीनता यातूनच गुणवत्तेत घट होते आणि एकदा जर का यात घट झाली तर परत ती एस्टॅब्लिश करणे अतिशय कठीण काम होऊन बसतं.

तर काही मुलं त्यांच्या अपेक्षेपेक्षाही जास्त किंवा त्यांच्या मूळ क्षमतेपेक्षा जास्त अचीवमेंट करतात त्यामध्ये मोठ्यांची किंवा बरोबरीच्यांची मदत किंवा चीटिंग केलेलं असतं. स्वतःला नेहमी स्वतःच्या क्षमतेपेक्षा जास्त समजतात.

बरेचदा शाळेबद्दल असलेली भीती ही शाळा अजिबात न आवडण्यातून येते. घरापासून फॅमिली पासून दूर असुरक्षित असल्याची जाणीव मुलांना होते. जबरदस्तीने त्यांना शाळेत पाठवलं तर ते शाळेत जायला किंवा तिथे थांबायला नकार देतात. बरेचदा स्कूल फोबिया हा शाळेमधल्या अप्रिय अनुभवातून येतो किंवा एखाद्या वेळी मुल पालकांशी भावनिक खूप अटॅच असेल किंवा विशेषतः आई शिवाय राहू शकत नसेल तर त्याला असुरक्षितता वाटून आईपासून दूर असल्याची चिंता सतावते. त्यावेळी खरं म्हणजे त्याला शाळा आवडत नाही असं नसतं तर ते संरक्षणासाठी पूर्णपणे घरावर अवलंबून असतं आणि घरापासून दूर जाण्याची त्याला भीती वाटत असते.

अशा विविध प्रकारे व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक, म्हणजे शिक्षण असे म्हणता येईल .फक्त शिक्षण विषयक दृष्टीकोन अनुकूल कसा होईल याची काळजी पालकांनी व शिक्षकांनी घ्यायला हवी.

Post a Comment

0 Comments