सर्वात मोठी बातमी ! शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर ; राष्ट्रवादीच्या बैठकीत ठराव मंजूर

                 राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक प्रदेश कार्यालयात सुरू झाली आहे. या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा मंजूर करणारा ठराव मांडण्यात आला आहे.


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक प्रदेश कार्यालयात सुरू झाली आहे. या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करणारा ठराव मांडण्यात आला आहे. हाच ठराव सर्वच नेत्यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष राहणार असल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे. थोड्याच वेळात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार हे पत्रकार परिषद घेऊन बैठकीबाबतची माहिती देणार आहेत.

        राष्ट्रवादीच्या निवड समितीची बैठक सुरू होताच प्रफुल्ल पटेल यांनी दोन ठराव मांडले. शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा एक ठराव मांडण्यात आला. दुसरा ठराव शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष ठेवण्याचा ठराव मांडण्यात आला. शरद पवार यांचा राजीनामा फेटाळून लावण्याचा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. तसेच पवार हेच राष्ट्रीय अध्यक्षपदी ठेवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. समितीची ही शिफारस आता शरद पवार यांना कळवली जाणार आहे. राष्ट्रवादीचे काही नेते शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना हे ठराव कळवणार आहेत.

देश आणि राज्यातील नेते बैठकीला उपस्थित

या बैठकीला छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, एकनाथ खडसे, अनिल देशमुख, पीसी चाको, सुनील तटकरे आणि इतर नेते उपस्थित होते. या बैठकीत इतर कोणताच ठराव मांडला नाही. कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. पर्यायी अध्यक्ष कोण असावा यावर एका शब्दानेही चर्चा झाली नाही. फक्त चार ओळींचा ठराव मांडून शरद पवार यांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

कार्यकर्त्यांची घोषणा बाजी

दरम्यान, एकीकडे पक्ष नेत्यांची बैठक सुरू असतानाच पक्षाच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमले होते. या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणू सोडला होता. हातात फलक घेऊन हे कार्यकर्ते जोरदार घोषणा देत होते. देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो… पवार साहेब… पवार साहेब… शरद पवार… शरद पवार अशा घोषणा हे कार्यकर्ते देत होते. रणरणत्या उन्हात हे कार्यकर्ते घामाघूम होत घोषणा देत होते. त्यामुळे या परिसरात तणावाचं वातावरण झालं होतं.


Post a Comment

0 Comments