कोकणातून आंब्यांची आवक कमी, हवामान बदलाचा परिणाम; अक्षय तृतीयेनंतरही आंबा आवाक्याबाहेर

 कोकण प्रतिनिधि : दर वर्षी अक्षय तृतीयेनंतर आंब्यांचे दर सामान्यांच्या आवाक्यात येतात. दुसऱ्या बहरातील आंब्यांची आवक वाढते. मात्र, यंदा हवामान बदलामुळे कोकणातील आंब्याच्या लागवडीवर परिणाम झाला असून, बाजारात आंब्याची आवक कमी आहे. आवक कमी झाल्याने अक्षय तृतीयेनंतरही घाऊक आणि किरकोळ बाजारात आंब्याचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत.



            साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला आंब्याच्या मागणीत वाढ होते. ग्राहकांकडून तयार आंब्याला मागणी वाढते. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात आंब्याचे दर चढे असतात. अक्षय तृतीयेनंतर आंब्याची आवक वाढून आंबा सामान्यांच्या आवाक्यात येतो. हा दर वर्षीचा अनुभव आहे. यंदा मात्र कोकणातून होणारी आंब्याची आवक कमी झाली आहे.

            हवामान बदलामुळे आंब्याच्या लागवडीवर परिणाम झाला असून, सध्या मार्केट यार्डातील घाऊक बाजारात तीन ते चार हजार पेट्यांची आवक होत आहे. दर वर्षी मे महिन्यात पहिल्या आठवड्यात २० ते २५ हजार पेट्यांपर्यंत आवक होते. दर वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याची आवक खूपच कमी आहे, असे मार्केट यार्डातील आंबा व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले.

            नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात काही भागात अवकाळी पाऊस झाला. हंगामाच्या पहिल्या टप्प्यात बाजारात आंब्याची आवक नियमित सुरू झाली. मार्च महिन्यात आवक अपेक्षेप्रमाणे सुरू होती. फेब्रुवारी महिन्यात दिवसा ऊन आणि रात्री तापमानात घट होत होती. त्यामुळे दुसऱ्या बहरातील मोहोर गळाला. परिणामी आंब्याच्या दुसऱ्या बहरातील आवक कमालीची घटली असून, आंब्याची नीचांकी आवक असल्याची माहिती आंबा व्यापाऱ्यांनी दिली.

घाऊक बाजारातील आंब्याचे दर

कच्चा आंबा पेटी (पाच ते नऊ डझन)- दोन ते चार हजार रुपये

तयार आंबा पेटी (पाच ते नऊ डझन)- अडीच ते साडेचार हजार रुपये

किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार आंब्याचे डझनाचे दर- ५०० ते एक हजार रुपये

रत्नागिरी, देवगड, रायगड जिल्ह्यातून आंब्याची आवक होत आहे. पुण्यातील मार्केट यार्ड आणि नवी मुंबईतील बाजार समितीच्या आवारात होणारी आंब्याची आवक अतिशय कमी आहे. दर वर्षी पुण्यातील फळबाजारात मे महिन्यात दररोज आंब्याच्या २० ते २५ हजार पेट्यांपर्यंत आवक व्हायची. यंदा लागवड कमी झाली असून, चार ते साडेचार पेटी एवढी आवक होत आहे. अक्षय तृतीयेनंतर आंबा सामान्यांच्या आवाक्यात येतो. यंदा आंब्याचे दर चढे आहेत.

Post a Comment

0 Comments