सध्या राज्यात ‘द केरला स्टोरी’ विरुद्ध महाराष्ट्र शाहीर असा वाद निर्माण झाला आहे. यावरुन विविध प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावर टीका केली होती. नुकतंच यावर अभिनेत्री अमृता खानविलकरने प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेत्री अमृता खानविलकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. अमृताने नुकतंच एक हटके फोटोशूट केले होते. त्याचे काही फोटो तिने पोस्ट केले होते. त्यावर एका नेटकऱ्याने तिला ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाबद्दल विचारले. त्यावर तिने भाष्य केले आहे.
“मॅडम.. ‘द केरला स्टोरी’ला मराठी सिनेसृष्टी प्रोत्साहन का करत नाही? सध्या सर्वच तरुण या चित्रपटाला प्रोत्साहन करतात, त्यामुळे लोकांची अपेक्षा आहे की अनेक आघाडीच्या कलाकारांनीही हे केलं पाहिजे.. मला माहित आहे की हे तितके सोपे नाही, पण जर बहुसंख्य लोकांनी केलं तर ते अवघडही नाही”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने अमृताच्या कमेंट बॉक्समध्ये केली आहे.
त्यावर अमृताने त्याला चांगलेच उत्तर दिले आहे. “कारण मी सध्या लंडनमध्ये आहे आणि अजूनही तरी हा चित्रपट पाहिलेला नाही. ‘महाराष्ट्र शाहीर’ पाहिला आणि त्याला प्रमोटही केले. तुम्ही पाहिला का?” असे प्रश्न विचारत अमृताने त्या नेटकऱ्याला सुनावले आहे.
दरम्यान सध्या सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाची चांगली चर्चा आहे. या चित्रपटाने पाच दिवसात ५० कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत.
0 Comments