मुंबई: मुंबईत दंगली घडवण्यासाठी २००४ साली ‘मातोश्री’वर बैठक झाली होती. उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत चर्नी रोड आणि दक्षिण मुंबईतील मुस्लीम फेरीवाल्यांवर हल्ले करण्याचे आदेश दिले होते, असा खळबळजनक गौप्यस्फोट भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केले. तसेच यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही खळबळजनक आरोप केले.
नितेश राणे म्हणाले “उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात आमचं महायुतीचं सरकार दंगली घडवतंय असा आरोप केला आहे. मात्र, १३ ऑगस्ट २००४ रोजी ‘मातोश्री’वर त्यांनीच दंगल घडवण्यासाठी बैठक घेतली होती. या बैठकीला एका खासदार आणि तीन जण हजर होते. १९९२-९३ साली जशा दंगली घडल्या, तशीच दंगल आपल्याला घडवायची आहे. त्यासाठी चर्नी रोड आणि दक्षिण मुंबईतल्या भागातील मुस्लीम फेरीवाल्यांवर वस्तऱ्याने हल्ले करा, असे आदेश त्यांनी या बैठकीत दिले होते”, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.पुढे बोलताना, “गेल्या ९ महिन्यांपासून महाराष्ट्रात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न होत असून त्यात उद्धव ठाकरे आणि टोळीचा हात असून, याची चौकशी गृहखात्याने केली पाहिजे”, अशी मागणीही त्यांनी केली.
संजय राऊत लँड माफिया
यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊतांवरही सडकून टीका केली. “संजय राऊत हा किती मोठा लँड माफिया आहे, हे मी महाराष्ट्राला सांगतो आहे. अलिबागच्या किहीम बीचवर संजय राऊतला जागा हवी होती. त्यामुळे मराठी कुटुंबाकडून कवडीमोल भावात दमदाटी करून जागा घेतली. किहीम बीचवर रिसॉर्ट बांधण्याचे त्याचे मनसुबे आहेत. कोट्यवधींची जमीन अवघ्या १० कोटींमध्ये घेतली. दुसऱ्यांना माफिया बोलणारा संजय राऊत किती मोठा लँड माफिया आहे हे आता महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे”, असा वार त्यांनी संजय राऊतांवर केला.
0 Comments