“तुम्ही सांगाल तिथे चर्चा करायला येतो”, चर्चेवर बहिष्कार टाकल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचे ग्रामस्थांना आवाहन, म्हणाले…
आज जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रशासन चर्चेला येताच ग्रामस्थांनी या चर्चेवर बहिष्कार टाकला.
रत्नागिरीतील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केला असून प्रशासनाने त्यांच्यासोबत चर्चेचे आवाहन केले आहे. आज जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रशासन चर्चेला येताच ग्रामस्थांनी या चर्चेवर बहिष्कार टाकला. जिल्हाधिकारी बोलत असताना ग्रामस्थ निघून गेले. “जिल्हाधिकारी म्हणून मी सर्वांना विनंती करतो, चर्चेसाठी केव्हाही या. प्रश्नांवर तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे”, अशी ग्वाही रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी माध्यमांशी बोलताना ग्रामस्थांना दिली.
जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह म्हणाले की, “काल राजापुरात रिफायनरी प्रकल्प विरोधक आणि समर्थक संघटनांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. दोन अडीच तास चर्चा केली. तरीही आज ड्रिलिंग साईटवर ३००-४०० लोक जमा झाले होते. मी, एसपी साहेब, कोकण डिव्हिजनचे आयजी यांनी त्यांच्यासबोत संवाद साधला. प्रशासन म्हणून आम्ही त्यांच्यासोबत संवाद साधला. प्रशासन म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. प्रश्न, अडीअचणींसाठी मागच्या एक महिन्यापासून चर्चा करत आहोत. पुढेसुद्धा करणार आहोत. सर्वांना एकच आवाहन आहे की, तुमचे जे प्रतिनिधी आहेत, त्या प्रतिनिधींसोबत कधीही त्यांच्या गावात जाऊन प्रशासन त्यांच्यासोबत चर्चा करेल. जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा करू. तुम्ही सांगाल तिथे चर्चा करायला आम्ही तयार आहोत.”
“आम्हाला तांत्रिक गोष्टींचीही स्पष्टता हवी होती. इंडियन ऑईल, सीएसआरचे तज्ज्ञ, इंजिनिअर इंडिया लिमिडटेचे तज्ज्ञांसोबतही आम्ही संवाद साधला आहे. जिल्हाधिकारी म्हणून मी सर्वांना विनंती करतो, चर्चेसाठी केव्हाही या. प्रश्नांवर तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे”, असंही त्यांनी पुढे नमूद केलं. तसंच, “कोणालाही तडीपार केलेल नसून जिल्हाबंदी आणि तालुकाबंदी लागू करण्यात आली होती. परंतु, त्यांच्यासोबतही आम्ही चर्चा करायला तयार आहोत”, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
0 Comments